गडचिरोलीत मोठा घोटाळा : फोटिफाईड राईसच्या नावावर निकृष्ट तांदळाचा पुरवठा

गडचिरोली : फोर्टिफाईड राईसच्या नावावर गोरगरीब नागरिकांच्या जिवाशी कसा खेळ केला जातो, याचा एक नमुना गडचिरोली जिल्ह्यात पाहावयास मिळाला आहे. देसाईगंज येथील एका राईस मिलमधून गडचिरोलीच्या गोदामात पाठविण्यात आलेला तांदूळ अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याने तांदूळ पुरवठ्याच्या माध्यमातून काही राईस मिलर्स शासनाला कोट्यवधीचा चुना लावत असल्याचे दिसून येत आहे.
आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी किमान आधारभूत योजनेंतर्गत खरेदी केलेले धान राईस मिलधारकांना भरडाईसाठी देण्यात येतात. या धानाची दहा दिवसांत भरडाई करुन फोर्टीफाईड राईस जिल्हा पुरवठा विभागाकडे जमा करणे अनिवार्य असते. मात्र, राईसमिलधारक तसे करत नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उच्चप्रतीच्या धानापासून उत्कृष्ठ दर्जाचा तांदूळ निर्माण करुन तो खुल्या बाजारात विकतात आणि छत्तीसगड, तेलंगणा इत्यादी राज्यांमधून निकृष्ट दर्जाचा तांदूळ खरेदी करुन तो शासनाकडे जमा करतात.
असाच गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील विशाल राईस मिलमधील तांदूळ देसाईगंज येथील आकाश अग्रवाल यांच्या गोदामातून ३१ जुलै २०२५ रोजी ट्रकमध्ये भरण्यात आला. ३४३२४७ क्रमांकाची टीपी असलेल्या या ट्रकमध्ये २३९.३९ क्विंटल तांदूळ होते. हा तांदूळ शुक्रवारी (ता.१) गडचिरोलीच्या शासकीय गोदामात जमा करण्यात आला. या तांदळाची पाहणी केली असता जनावरांनाही खाण्यास अयोग्य असा हा तांदूळ असल्याचे दिसून आले. तांदळात सोंडे, धान आणि तुकडे होते. हाच तांदूळ आता रेशन दुकानांमध्ये पुरवठा करण्यात येणार असून, गोरगरीब नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जाणार आहे. शासन अशा पुरवठाधारकांवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तांदळाची तपासणी करुन कारवाई करु : जिल्हा पुरवठा अधिकारी
निकृष्ट दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात जमा झाला असेल, तर त्याची तपासणी करुन संबंधित राईस मिलधारकावर कठोर कारवाई करु, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रसेन्नजित प्रधान यांनी सांगितले.